ठेकेदाराविरुद्ध होणार कारवाई : “ईएसआय’ रुग्णालयामध्ये जेवणात अळ्या
पिंपरी – मोहननगर येथील ई.एस.आय. रुग्णालयात करोनाचा उपचार सुरू असलेल्या रुग्णांना ठेकेदाराकडून निकृष्ट जेवण देण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याशिवाय, जेवणामध्ये अळ्या, माशा सापडत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्याला अनुसरून महापालिका प्रशासनाने रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे अहवाल मागविला आहे. ठेकेदाराविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
मोहननगर येथील ईएसआय रुग्णालयात करोनाच्या 100 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील डॉक्टर अतिशय चांगल्या पद्धतीने या रुग्णांवर उपचार करत आहेत. त्याबाबत रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाधानी आहेत. मात्र, येथील रुग्णांना ठेकेदाराच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या जेवणामध्ये माशा, अळ्या सापडत आहेत. त्याची त्या-त्या वेळी रीतसर तक्रार देखील करण्यात आली. मात्र, संबंधित ठेकेदाराने त्यामध्ये कोणतीही सुधारणा केलेली दिसत नाही. गुरुवारी (दि. 23) पुन्हा जेवणामध्ये माशा, अळ्या आढळल्या. त्याशिवाय, निकृष्ट चपात्या व भाज्या रुग्णांना देण्यात आल्या. याबाबत रुग्णांनी तक्रार आक्षेप घेतला आहे.
संबंधित ठेकेदार महापालिकेकडून लाखो रुपयांचे बिल वसूल करून रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण देऊन रुग्णांच्या जीविताशी खेळत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराविरुद्ध आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून त्वरित फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबत आयुक्तांना पत्र दिले आहे. संबंधित ठेकेदाराविरुद्ध आयुक्तांनी कारवाई केल्यास अन्य सर्व रुग्णालयात देखील भोजन पुरवठा करणारे ठेकेदार सुधारतील. पर्यायाने, रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळेल, असे भापकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मोहननगर येथील ई.एस.आय. रुग्णालयातील जेवणाबाबत येत असलेल्या तक्रारीला अनुसरून रुग्णालयातील डॉक्टरांकडे अहवाल मागविला आहे. ठेकेदाराविरुद्ध उचित दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून सक्त ताकीद देण्यात येईल. अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना याबाबत अहवाल सादर करण्यात येत आहे. ठेकेदाराविरुद्ध कारवाई केल्यानंतर देखील जर त्याने जेवणाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले तर त्याचे काम रद्द करण्यात येईल.
– मंगेश चितळे, सहाय्यक आयुक्त.