कुंभार समाज सामाजिक संस्थेची राज्य शासनाकडे मागणी
पिंपरी – राज्य शासनाने गणेश मूर्तींच्या उंचीसंदर्भात घेतलेला निर्णय राज्यातील कुंभार समाजाला उद्ध्वस्त करणार ठरणार आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी नगरसेवक सतीश दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले आहे.
राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेश मूर्तींची उंची चार फुट तर घरगुती गणेशोत्सवाच्या गणेशमूर्तींची उंची दोन फूट ठेवावी असे आदेश काढले आहेत. या संदर्भातील आदेश गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) यांनी पारित केला आहे.
सतीश दरेकर या संदर्भात म्हणाले की, गणेशमूर्तींच्या उंचीबाबतच्या आदेशाला उशीर झाला आहे. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव असल्याने कुंभार समाज उत्सवाच्या आधी आठ ते दहा महिने मूर्ती तयार करण्याचे काम करत असतात. यासाठी मूर्तीकार मोठ्या प्रमाणात कर्जे घेत असतात. सद्य स्थितीत करोनामुळे कुंभार समाज आधीच मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
शासनाच्या गणेश मूर्तींच्या या आदेशामुळे तयार केलेल्या मूर्ती विकल्या जाणार नाहीत व राज्यातील कुंभार समाज मोठ्या अर्थिक संकटात सापडून पूर्णतः उद्ध्वस्त होईल यामुळे या मार्गदर्शक सूचना निर्णयातील क्र. तीनच्या मुद्याचा शासनाने फेरविचार करावा व क्र. 3 ची अंमलबजावणी या वर्षी करु नये, अशी विनंती शासनाला केली आहे. या संदर्भात सतीश दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख व गृहविभागाचे प्रधान सचिव यांना पत्र पाठवून फेरविचार करावा अशी विनंती केली आहे.