नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच ‘कल्पतरू ग्रुप’ या दिग्गज बांधकाम कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या पथकाने कंपनीचे ज्या ज्या राज्यांमध्ये कार्यालय आहे त्याठिकाणी छापे टाकले होते. दरम्यान, तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरीचा तपास विभागाकडून सुरू आहे. दरम्यान, आता तब्बल २० दिवसानंतर आता प्राप्तिकर विभागाला कल्पतरू ग्रुपचे सुमारे 600 कोटी रुपयांचे बनावट बिलिंग तपशील सापडले आहेत.
आयकर विभागाच्या पथकाने 4 ऑगस्ट रोजी कल्पतरू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयावर छापे टाकले होते. कंपनीच्या मुंबई, गुजरात, राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले. त्यानंतर जवळपास आठवडाभर चाललेल्या या छाप्यात विभागाच्या हाती करचुकवेगिरीशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. विभागाच्या अहवालानुसार, बनावट बिलिंगद्वारे कल्पतरू कंपनीने 600 कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यासोबतच राजस्थानमधील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबाशी असलेल्या या ग्रुपचे जवळचे संबंधही समोर आले आहेत.
जवळपास तीन दशकांपासून कल्पतरू ग्रुप देशभरात बांधकाम, ऊर्जा आणि रिअल्टी क्षेत्रात काम करत आहे. यामध्ये बनावटगिरी सुरू असतानाच हा ग्रुप प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आला आणि हे प्रकरण गांभीर्याने घेत 4 ऑगस्ट रोजी विभागाकडून कंपनीच्या 30 ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर त्यात सापडलेल्या कागदपत्रांची आणि खात्यांची चौकशी सुरू झाली, ती अजूनही सुरूच आहे. या छाप्यात अधिकाऱ्यांनी या ठिकाणांहून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि वस्तू जप्त करून तपास पुढे नेला असून, आता बिलिंग फसवणुकीचा मोठा खुलासा केला आहे.
मात्र, या बनावटगिरीबाबत कल्पतरू कन्स्ट्रक्शनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, छापेमारीत कंपनीच्या विविध कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या वह्या व खात्यांच्या तपासणीत ही मोठी हेराफेरी उघडकीस आली आहे.