पिंपरी – दिघी व बोपखेल ही गावे हवेली तालुक्यातून वगळून पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयातील सज्जांना जोडण्याची मागी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. त्यामुळे उत्पन्न व रहिवाशी दाखला, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र यांचे पोर्टल हवेली व पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालय एकत्र असल्यास विद्यार्थी तसेच नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे आ. लांडगे यांनी नमूद केले आहे.
आ. लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील दिघी व बोपखेल ही गावे यापूर्वी हवेली तहसील कार्यालय, जि. पुणे अंतर्गत येत होती. मागील काही कालावधीमध्ये सदर गावे अभिलेख सहीत पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्न केली आहेत. परंतु सदर गावे हवेली तहसील कार्यालयाच्या हद्दीतील सज्जात समाविष्ट असल्याने गाव पिंपरी चिंचवड मधील पण तलाठी आस्थापना हवेलीकडे अशी अवस्था असल्याने या तलाठी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. उत्पन्न व रहिवाशी दाखला, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र यांचे पोर्टल हवेली व पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालय एकत्र असल्याने विद्यार्थ्यांना मिळताना अडचण यत आहे.
नागरिकांना सदरील दाखले काढण्याकरीता पोर्टलवर ताण येऊन नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. शालेय महाविद्यालयांतील प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांकरीता अनेक महिन्यांची वाट पाहवी लागते. त्यानुसार हवेली तहसील कार्यालय व पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालय यांचे पोर्टल स्वतंत्र करणे गरजेचे आहे. अपर तहसील कार्यालय यांना अतिरिक्त कर्मचारी वर्ग देऊन अभिलेख, संजय गांधी योजनेचे स्वतंत्र डेस्क या कार्यालयात निर्माण कारणेचीही मागणी केली आहे.