पुणे – “श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र-अयोध्या आणि हेरिटेज हॅंडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट- पुणे’ यांच्या विद्यमाने “दो धागे श्रीराम के लिए’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत दि. 10 ते 22 डिसेंबरदरम्यान कोथरूडमधील काकडे फार्म येथे अयोध्येतील रामाच्या मूर्तीसाठी नागरिकांना वस्त्र विणण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता येणार आहे. याच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी आणि “हेरिटेज हॅंडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या संचालिका अनघा घैसास, अध्यक्ष विनय पत्राळे यांनी दिली. घैसास यांनी संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना सांगितली. समाजातील अनेकविध जाती, पंथ, प्रांतातील नागरिक आपले आर्थिक स्तर आणि भाषिक विविधता यांच्या सीमा ओलांडून रामलल्लासाठी वस्त्र विणायला एकत्र येतील. यामध्ये श्रीराममंदिराच्या उद्घाटनादिवशी रामाला सोन्याच्या धाग्यांनी बनवलेले वस्त्र परिधान करण्यात येणार असून, त्याचे विणकामही करण्यात येणार असल्याचे घैसास म्हणाल्या.
काय आहे या उपक्रमात
- 10 डिसेंबर रोजी होम-हवनाने उपक्रमाची सुरूवात
- भव्य मंडप, उपक्रमादरम्यान तेथे व्याख्याने, कीर्तन, आरती, महाप्रसाद होणार, चित्रप्रदर्शनीही असेल.
- देशभरातील प्रत्येक राज्यातील हातमाग विणकर येथे येणार. शिवाय नेपाळ आणि अन्य काही देशातील विणकरही असतील.
- सर्वसामान्य व्यक्तीलाही धागे विणता येतील. त्यांना प्रात्यक्षिक दाखवले जाईल.
- मंदिरातील अन्य मूर्तींसाठीही वस्त्र असतील.
मंदिर उभारणीसाठी परदेशांतूनही निधी
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी वेगवेगळ्या देशांत नागरिकांनी पैसे गोळा करून ठेवले आहेत. मात्र आजवर हा निधी न्यासाने स्वीकारला नसून, आता न्यासास तीन वर्षे पूर्ण झाले असल्याने “एफसीआरए’ अर्थात परदेशी योगदान (नियमन) कायद्याअंतर्गत आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही हा निधी स्वीकारू शकू, अशी माहिती गोविंदगिरी महाराज यांनी दिली.