पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाल्हेकरवाडी येथील शाळेत दोन वेगवेगळ्या वर्गातील मुले एकाच वर्गात दाटीवाटीने बसवून एकच शिक्षक त्यांना शिकवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेतील शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे हा परिणाम असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा संताप पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
शिक्षकांची कमतरता भासू लागल्याने शिक्षण विभागाने कंत्राट पध्दतीने 200 हून अधिक शिक्षकांची भरती केली. त्यातील काही शिक्षकांनी कामावर रुजू होण्यास नकार दिला आहे. उपलब्ध शिक्षक देखील महापालिकेच्या शाळेत कमी पडू लागले आहेत. वाल्हेकरवाडी येथील शाळा क्रमांक 18/2 मध्ये शिक्षकांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थी एकाच वर्ग खोलीत बसवून त्यांना अभ्यासक्रम शिकवले जात आहे. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर भाजपच्या चिंचवड-किवळे मंडल अध्यक्षा पल्लवी वाल्हेकर यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली.
सरकारकडून शिक्षणावर भरमसाठ खर्च केला जात आहे. 200 हून अधिक शिक्षक भरती करुनही वाल्हेकरवाडीच्या शाळेत शिक्षकांची कमतरता भासत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. एकाच वर्गात दोन वेगवेगळ्या वर्गाचे विद्यार्थी बसवून त्यांना शिकवले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा परिसरात पावसाचे पाणी साचलेले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचल्यास त्याला कोण जबाबदार? असा प्रश्न वाल्हेकर यांनी उपस्थित केला आहे.
वाल्हेकरवाडी शाळेतील हा प्रकार निदर्शनास आणून देण्यासाठी तीनवेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आयुक्त महापालिका कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांना अनेकदा निवेदने दिली. शिक्षक उपलब्ध होण्यासाठी तीन महिन्यांपासून पाठपुरावा केला. तरी, आयुक्तांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे वाल्हेकरवाडी, चिंचवड भागातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याची तातडीने दखल घेऊन वाल्हेकरवाडीच्या शाळेत शिक्षकांची पूर्तता करावी. अन्यथा आपल्या विरोधात आंदोलन करावे लागेल.
– पल्लवी वाल्हेकर, अध्यक्षा, चिंचवड-किवळे मंडल