जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज व माजी कर्णधार फाफ डुप्लेसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती मागे घेत पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षी वेस्ट इंडिज व अमेरीकेत होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत संघात पुनरागमन करण्याची त्याची इच्छा आहे. त्याने याबाबत संघाचे प्रशिक्षक व कर्णधार आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाशीही संवाद साधला असून त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. तसेच तंदुरुस्तीवरही सध्या मेहनत घेत आहे. संघातील अन्य सहकारी खेळाडूंनीही माझ्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. मी पुनरागमन केल्यावर जर संघाचा लाभ होणार असेल तर मलाही पुन्हा एकदा देशाकडून खेळण्याचे भाग्य लाभेल.
खरेतर मी टी-२० किंवा एकदिवसीय सामन्यांतून निवृत्ती घेतली नव्हती तर कसोटी क्रिकेटला अलविदा केले होते. दरम्यानच्या काळात जगभरात होत असलेल्या विविध टी-२० लीगमध्ये मी खेळतच होतो त्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणे मला कठीण होणार नाही, असा विश्वासही डुप्लेसीने व्यक्त केला.
World Cricket : दोन वेगवेगळ्या घटनेनं जागतिक क्रिकेटला गैरवर्तनाचे गालबोट…
डुप्लेसीने २०१९ साली अखेरचा टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याची कामगिरी फारशी सरस झाली नाही म्हणून त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते. त्याचवेळी त्याने कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेत केवळ मर्यादीत षटकांच्या सामन्यांवरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले होते. आता तो निवृत्ती मागे घेत असला तरीही ती केवळ मर्यादीत षटकांच्या सामन्यांबाबतच असेल कसोटी क्रिकेटसाठी नाही हे देखील समोर आले आहे.