Pakistan Cricket : महिला टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेच्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकापूर्वी पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. 15 वर्षे पाकिस्तानकडून खेळल्यानंतर तिने आपली कारकीर्द संपवली आहे. पाकच्या दिग्गजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली.
पाकिस्तान महिला संघाकडून खेळणारी स्टार फलंदाज जावेरिया खान हिने निवृत्ती जाहीर केली आहे. तिने 15 वर्षांची कारकीर्द संपवली. 35 वर्षीय जवेरियाने पाकिस्तानसाठी 100 हून अधिक एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
Javeria Khan Retirement
जवेरियाने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून लिहिले आहे की, “सुख-दु:ख तर होतेच, पण त्याहूनही मोठी अभिमानाची भावना होती जीनं 15 वर्षे मला टिकवून ठेवले. माझ्या क्रिकेट प्रवासात मला आलेल्या अडचणींपेक्षा पाकिस्तानची जर्सी घालण्याचा बहुमान मोठा होता. मी धन्य आहे की, मी माझ्या आयुष्यात जे मला सर्वात जास्त आवडते तेच केले आणि पुढेही करत राहीन.” आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या जवेरिया खाननेही ती लीग क्रिकेट खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अशी होती तिची आंतरराष्ट्रीय कारकीर्द…
जवेरियाने 2008 ते 2023 पर्यंत पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या काळात तिने 116 एकदिवसीय आणि 112 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ODI च्या 113 डावांमध्ये, जावेरियाने 28.56 च्या सरासरीने 2885 धावा केल्या, ज्यामध्ये 2 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश होता, ज्यामध्ये तिचा उच्च स्कोअर 133* धावा होता. याशिवाय, T20 आंतरराष्ट्रीय 106 डावांमध्ये फलंदाजी करताना, जावेरियाने 21.69 च्या सरासरीने 2,018 धावा केल्या ज्यामध्ये तिने 74* धावांच्या उच्च स्कोअरसह 10 अर्धशतके केली.
उल्लेखनीय आहे की, जावेरियाने पाकिस्तान महिला संघाकडून खेळताना चार एकदिवसीय विश्वचषक खेळले, ज्यात 2009, 2013, 2017 आणि 2022 च्या स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय तिने 2009, 2010, 2012, 2014, 2016, 2018, 2020 आणि 2023 मध्ये एकूण 8 टी-20 विश्वचषक खेळले.