MS Dhoni Retirement : न्यूझीलंड विरुद्ध 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीत धोनी धावबाद झाल्यानंतर भारताने सामना 18 धावांनी गमावला. महेंद्रसिंग धोनीचे पॅव्हेलियनमध्ये परतणे हा अजूनही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक आहे. त्या भावनिक क्षणाला चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता धोनीने त्या क्षणाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
5 ऑगस्ट 2022 ला धोनीनं निवृत्तीची केवळ औपचारिक घोषणा केली, मात्र त्यापूर्वीच धोनीनं आपल्या निवृत्तीचा निर्णय घेतला होता. धावबाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने धोनी मैदानातून पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आणि लोकांनी धोनीला स्टँडिंग ओव्हेशन दिले, त्यावरून चाहत्यांना कळले होते की, ते धोनीला शेवटच्या वेळी भारतीय जर्सीत पाहत आहेत. धोनीची कारकिर्द रनआऊटने सुरू झाली आणि रनआऊटने संपली. आता धोनीने त्याचा शेवटचा दिवस आणि त्यामागची संपूर्ण घटना सांगितली आहे. एका कार्यक्रमात स्वतः धोनीनं यासंदर्भात माहिती दिली असून सध्या धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका व्यावसायिक कार्यक्रमावेळी बोलताना धोनीने जवळपास 4 वर्षांनंतर आपल्या निवृत्तीचे गुढ उकललं आहे.
मँचेस्टरमध्ये त्या संध्याकाळी मार्टिन गुप्टिलने धावबाद करून एमएस धोनी पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा भारतासाठी हा त्याचा शेवटचा सामना आहे असे अनेकांना वाटले नसेल. आता धोनीने खुलासा केला आहे की, त्याच क्षणी त्याला माहित होते की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला वेळ संपला आहे.
कार्यक्रमादरम्यान धोनीने सांगितला संपूर्ण घटनाक्रम…
धोनी एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला की, ज्यावेळी तुम्ही खूप थोड्या धावांनी सामना हरता त्यावेळी भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण असते. माझ्यासाठी, तो (2019 भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनल) मी भारतासाठी क्रिकेट खेळण्याचा शेवटचा दिवस होता. मी त्यानंतर एक वर्षानंतर निवृत्त झालो, पण सत्य हे आहे की मी त्याच दिवशी निवृत्त झालो होतो. पण मला त्यावेळी निवृत्तीची घोषणा करायची नव्हती.
MS Dhoni talking about his final day of International career.
– A sad day in indian cricket history…..!!!!pic.twitter.com/QqaRCsYzIO
— Johns. (@CricCrazyJohns) October 26, 2023
पुढे तो म्हणाला की, आम्हा क्रिकेटपटूंना काही मशीन्स दिल्या जातात. त्यामुळे जेव्हा कधी मी ट्रेनरकडे जायचो तेव्हा त्याला परत देत असे. यावर ट्रेनर म्हणायचा, ‘नाही, तू ठेव.’ त्यावेळी माझ्या मनात विचार यायचा की मी याला कसं सांगू की आता मला याची काही गरज राहिलेली नाही.’ पण त्यावेळी मला निवृत्तीची घोषणा करायची नव्हती.
दरम्यान, 2019 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये 10 जुलै 2019 ला मँचेस्टरवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनल सामना झाला होता. अटीतटीच्या सामन्यात धोनी ऐन मोक्याच्यावेळी धावबाद झाला. त्यानंतर भारताचा पराभव झाला अन् वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. धोनी रनआऊट झाल्यानं कोट्यवधी भारतीय हिरमूसले होते. धोनी स्वतःही हमसून हमसून रडला होता.