नवी दिल्ली – भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू अजय जडेजा याने पाकिस्तानचा प्रशिक्षक होशील का या प्रश्नावर होकार दिला आहे. त्याला पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नव्हे तर एका कार्यक्रमात हा प्रश्न विचारला गेला होता त्यावर जडेजाने हे मत व्यक्त केले.
जडेजा जेव्हा भारतीय संघाकडून खेळत होता तेव्हा अनेकदा त्याचे पाकिस्तानी खेळाडूंशी भर मैदानावर खटके उडालेले आहेत. यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत जडेजा अफगाणिस्तानचा प्रशिक्षक बनला होता. त्याचाच संदर्भ घेत एका पत्रकाराने जडेजाला हा प्रश्न विचारला होता.
अर्थात जडेजा हे गंमतीने बोलला असेच संकेत त्याने दिले आहेत. १९९६ सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत जडेजाने वकार युनुसच्या गोलंदाजीवर हल्ला चढवताना अफलातून खेळी केली होती. त्यानंतर जेव्हा जेव्हा तो पाकविरुद्ध खेळला तेव्हा प्रत्येक सामन्यात त्याची पाकिस्तानच्या खेळाडूंशी चकमक उडाली होती. त्यामुळे असा प्रश्न विचारल्यावर त्याने दिलेले उत्तर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारे ठरले.