Imad Wasim announces retirement from international cricket – पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्याच्या आठ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट केला. वसीमने पाकिस्तानसाठी १२१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात ५५ एकदिवसीय आणि ६६ टी-२० सामन्यांचा समावेश आहे.
समाजमाध्यमावरून त्याने आपला निर्णय जाहिर केला आहे. इमादने या वर्षी एप्रिलमध्ये रावळपिंडी येथे न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मध्ये पाकिस्तानसाठी शेवटचा सामना खेळला होता. वेल्समध्ये जन्मलेल्या इमादने २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या लाहोर येथील टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
निवृत्तीची घोषणा करताना वसीम म्हणाला, “अलिकडच्या काळात मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल खूप विचार केला आणि शेवटी मी या निष्कर्षावर पोहोचलो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे.”
डावखुरा फलंदाज वसीमने पाकिस्तानसाठी ५५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९८६ धावा केल्या आणि डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून ४४ बळी घेतले. त्याच्या नावावर ६६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४८६ धावा आणि ६५ विकेट आहेत.