राज्यात महाआघाडी, पाटणमध्ये बिघाडी

सूर्यकांत पाटणकर
सरकारच्या अभिनंदनाचे वेगवेगळे फ्लेक्‍स; देसाई-पाटणकर गटांमधील संघर्ष कायम

पाटण – राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मात्र, पाटणमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे देसाई व राष्ट्रवादीचे पाटणकर यांच्या गटांचा सवतासुभा कायम आहे. त्यामुळे राज्यात महाआघाडी तर पाटणमध्ये बिघाडी, असे चित्र आहे.

राज्यात भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. सरकार स्थापनेनंतर राज्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत.


शिवसेना-राष्ट्रवादीच्या राज्यातील कार्यकर्त्यांचा संघर्ष मावळताना दिसत आहे. मात्र, पाटण तालुक्‍यात राजकीय परिस्थिती “जैसे थे’ आहे. तालुक्‍यात मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करणारे फ्लेक्‍स झळकत आहेत. मात्र, पारंपरिक प्रतिस्पर्धी देसाई-पाटणकर गटांनी अद्यापही एकमेकांचा विरोध कायम असल्याचे फ्लेक्‍सद्वारे दाखवून दिले आहे.

आ. शंभूराज देसाई यांनी महाआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडीतील तिन्ही पक्षांच्या अभिनंदनाचे फ्लेक्‍स लावले आहेत. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही तिन्ही पक्षांचे प्रमुख व इतर कार्यकर्त्यांचे फोटो फ्लेक्‍सवर लावून सरकारचे अभिनंदन केले आहे. आ. देसाई व सत्यजितसिंह पाटणकर यांचे एकत्रित फोटो फ्लेक्‍सवर दिसत नसल्याने याबाबत चर्चा रंगली आहे.

तालुक्‍यात देसाई-पाटणकर यांचा राजकीय संघर्ष नवा नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याविरोधात विक्रमसिंह पाटणकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यात पाटणकरांचा पराभव झाला होता. लोकनेत्यांच्या निधनानंतर तीस वर्षे तालुक्‍याचे नेतृत्व विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या उभारणीपासून शिवाजीराव देसाई यांच्या बरोबरीने 14 वर्षे कारखान्याचा कारभार विक्रमसिंह पाटणकर यांनी केला होता. त्यावेळी त्यांच्यातील सौख्यही तालुक्‍याने पाहिले होते. त्यानंतर साखर कारखान्याची सत्ता शंभूराज देसाई यांच्याकडे तर आमदारकी विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडे होती.

2014 साली विक्रमसिंहांचे पुत्र सत्यजितसिंह यांनी शंभूराज देसाई यांच्या विरोधात पहिल्यांदा निवडणूक लढविली. त्यात सत्यजित यांचा पराभव झाला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवास सामोरे जावे लागले; परंतु महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या दोन गटांमधील तणाव निवळेल, अशी आशा होती. मात्र, तो कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत.

आता तरी विरोध विसरा
पाटण तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असल्याने येथे तुलनेने औद्योगिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. या तिन्ही क्षेत्रातील तालुक्‍याचे दारिद्य्र दूर करण्यासाठी देसाई-पाटणकर गटांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मात्र, केवळ विरोधाला विरोध करण्याची भूमिका दोन्ही गटांनी घेतल्याने तालुक्‍याच्या विकासावर परिणाम होत आहे. भविष्यात दोन्ही गटांच्या नेत्यांनी वैचारिक उंची वाढवून तालुक्‍याच्या विकासावर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.