बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा सज्ज

पाटस येथे वन विभागाकडून तत्परता : नागरिक भीतीच्या छायेत
वरवंडल (वार्ताहर) – दौंड तालुक्‍यातील पाटस येथे बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वन विभागाच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. टोलनाक्‍यापासून जवळच अरुण भागवत यांच्या घराशेजारील उसाच्या शेतात हा पिंजरा लावण्यात आला आहे. पिंजरा लावण्यात आल्याने बिबट्या पकडला जाईल, अशी आशा नागरिकांना लागून राहिली आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत पिंजऱ्यात बिबट्या अडकला नव्हता.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोलनाक्‍यापासून जवळच्या अंतरावर महामार्गानजीकच ग्रामपंचायत सदस्य अरुण भागवत यांचे घर आहे. अरुण भागवत यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या कोंबड्यांच्या खुराड्यापासून काही अंतरावर फिरणाऱ्या एका कोंबड्यास बिबट्याच्या पिलाने पकडून नेल्याची आणि एक कोंबडा गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि.3) दुपारी बाराच्या सुमारास घडली होती. भरदुपारी बिबट्याच्या पिल्लाने हल्ला केल्यामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत.

काही दिवसांपूर्वी महामार्गावर भागवत यांच्या घरापासून जवळच्या अंतरावर बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला होता. पाटस ग्रामपंचायतीच्या वतीने दौंडचे वन अधिकारी महादेव हजारे यांना पाटस येथे बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, यासाठी पत्र देण्यात आले होते. सकाळी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला. यावेळी दौंड वनपरीक्षेत्र अधिकारी महादेव हजारे, वनरक्षक नाना चव्हाण, वनरक्षक पद्मिनी कांबळे, वनमजुर संतोष नरुटे, अरूण बापूराव मदने, बाबासाहेब मारुती कोकरे उपस्थित होते.

बिबट्याचे वारंवार दर्शन
गेल्या काही दिवसांपासून पाटस आणि जवळच्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे. तर पाटस येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्‍याजवळ वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यांनंतर दोन दिवसांनंतर ठवरे-भागवत वस्ती परिसरात बिबट्यासदृश्‍य प्राणी एका शेतकऱ्याने पाहिला होता. कुसेगाव येथे रविवारी रात्री सातच्या सुमारास कुसेगावचे पोलीस पाटील गणेश शितोळे यांसह ग्रामस्थांनी बिबट्या पहिला होता. त्यानंतर मंगळवारी अरुण भागवत यांच्या घराजवळ बिबट्याच्या पिलाने कोबड्यांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. बिबट्याचे दर्शन वारंवार झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पाटस, कुसेगाव परिसरात नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.