भुईभाडे शुल्कवाढीचा निषेध चर्चा करून
तोडगा काढण्याची महापौरांची ग्वाही
पिंपरी – अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असताना मूर्ती विक्रेत्यांवर संप करण्याची वेळ आली आहे. बुधवारी अचानकच शहरातील सर्व गणेशमूर्ती विक्रेत्यांनी आपले स्टॉल बंद करुन महापालिकेत धाव घेतली. प्रदूषण निर्मूलन शुल्काच्या नावाखाली महापालिकेने गणेशमूर्ती विक्री स्टॉल्ससाठी भूईभाड्यामध्ये सहापट वाढ केली आहे.
शुल्क कमी करण्याची विक्रेत्यांची मागणी असताना महापालिका प्रशासनाने तोडगा काढण्याऐवजी कारवाईची भूमिका घेतल्याने संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी बुधवारी दिवसभराचा बंद पाळला. विक्री बंद ठेवल्याने “बुकींग’साठी आलेल्या गणेशभक्तांचे हाल झाले. दरम्यान, प्रशासनाशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्वासन महापौर राहुल जाधव यांनी विक्रेत्यांना दिले आहे.
महापालिकेकडून स्टॉल्सला परवानगी देताना भूईभाडे आकारले जाते. गतवर्षी एक हजार रुपये भूईभाडे अधिक जीएसटी (वस्तू व सेवा कर) असे परवाना शुल्क आकारले होते. यंदा महापालिकेने अचानकपणे सहा पटीने भूईभाडे वाढविले आहे. स्टॉल्स उभारणीच्या खर्चात यंदा पंधरा टक्के वाढ
झाली आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिस व रंगातील दरवाढीमुळे गणेश मूर्तीच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के वाढ झाली आहे. त्यात महापालिकेने भूईभाडे म्हणून दीड हजार, प्रदूषण निर्मूलन शुल्काच्या नावाखाली साडे चार हजार रुपये आणि त्यावर अठरा टक्के जीएसटी असे एकूण मिळून सहापटीने वाढ केली आहे.
कुंभार समाज संघटना तसेच विक्रेता संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दाद दिली नाही.
उलट “ह’ क्षेत्रीय कार्यालयाकडील काही अधिकारी व कर्मचारी पिंपरीगावात कारवाईसाठी आले. त्यामुळे संतापलेल्या विक्रेत्यांनी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर टप्प्या-टप्प्याने पिंपरीगावासह, संत तुकारामनगर, थेरगाव, डांगे चौक, चिखली, रामनगर, कासारवाडी आदी भागातील विक्रेत्यांनी विक्री बंद केली. प्रमुख प्रतिनिधींनी महापालिकेत धाव घेतली. शिष्टमंडळाने महापौर जाधव यांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले.
त्यावर महापौरांनी प्रशासनासोबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. गुरुवारी याबाबत बैठक घेऊ, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सायंकाळी विक्री स्टॉल्स खुले करण्यात आले. शिष्टमंडळात विनायक मुरादे, सागर जाधव, ललित शहा, अनिल तुरुक, शंकर कुंभार, प्रशांत पिसे, अमित कलापुरे, बालाजी भालेकर, बाळू कुंभार, बापू कुंभार, ओम कुंभार, रामचंद्र करकटकर, शंकर राजे, सिद्धार्थ वाघेरे, अनिल पारचा आदींचा समावेश होता.
गणराया आयुक्तांना सद्बुद्धी दे!
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीं विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी भूईभाडे वाढविल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. परंतु, मूर्ती तयार करण्याचे काम वर्षभर चालते. महापालिकेने आधीच धोरण ठरवायला हवे होते. मूर्ती तयार करुन विक्री सुरू झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. सल्लागारांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यासाठी प्रामाणिकपणे परवाने घ्यायला जाणाऱ्या विक्रेत्यांच्या माथी अवाजवी भूईभाडे मारले आहे. ज्या प्रमाणात मागणी आहे. त्याप्रमाणात शाडूच्या मूर्ती तयार होऊ शकत नाहीत. केवळ महापालिकेनेच अशा प्रकारचे शुल्क लादले आहे. गणरायाने आयुक्तांना सद्बुद्धी द्यावी, असे साकडे विक्रेत्यांनी घातले.