मुंबई : सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयने काही वेळापूर्वीच अनिल देशमुख यांचा ताबा घेतला असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने देशमुखांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी ते अंमलबजावणी संचलनालयाच्या ताब्यात होते.
गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने दरमहा 100 कोटींच्या वसूली प्रकरणी सचिन वाझे, संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि अनिल देशमुख या चौघांचा ताबा घेण्याची परवानगी तपास यंत्रणेला दिली होती. त्यानुसार सीबीआयने सचिन वाझेसह पालांडे आणि शिंदे या देशमुखांच्या दोन सहाय्यकांना सोमवारी सीबीआयकडून अटक करण्यात आली.
अटकेनंतर या तिघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने या तिघांना सात दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल देशमुख अचानक जेजे रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांना सीबीआय त्यांचा ताबा घेऊ शकली नाही. मात्र मंगळवारी देशमुखांना डिस्चार्ज दिल्याने सीबीआय ताबा घेण्याआधीच देशमुखांनी त्याविरोधात हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. परंतु या याचिकेवरील सुनावणीआधीच सीबीआयने आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुख यांना ताब्यात घेतले आहे.