नवी दिल्ली : राज्यात सत्ताधारी आणि विरोधक संघर्ष सुरु असतानाच दिल्लीत मोठ्या भेटीगाठींना सुरुवात झाल्याचे पहायला मिळत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात यापूर्वी मागील वर्षी 17 जुलै रोजी भेट झाली होती. त्यावेळी देखील विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. देशाच्या राजकारणातील मोठे नेते असणाऱ्या शरद पवार आणि मोदींमध्ये भेट झाल्यानंतर त्याची नेहमीच चर्चा होत असते. मात्र यावेळी शरद पवारांनी घेतलेली भेट आणि महाराष्ट्रातील घडामोडी यामुळे याची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२.३० च्या सुमारास पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये २० ते २५ मिनिटं चर्चा सुरु होती. या भेटीत फक्त दोन्ही नेते उपस्थित असल्याचं समजत आहे. पण यावेळी नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण यावेळी राजकीय चर्चाही झाल्याची शक्यता आहे.