ओमिक्रॉनची धास्ती! आज पुन्हा मंत्रिमंडळाची तातडीची बैठक; राज्यात पुन्हा काही निर्बंध?

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटने जगाला पुन्हा एकदा धास्ती भरली आहे.  त्यामुळे देशभरात सतर्कता बाळगण्यात येत आहे. त्यातच राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशी चर्चा करणार आहेत. त्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्यातील  शाळा 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयावर आता फेरविचार होण्याची शक्यता आहे. आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. यात 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांबाबत काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात  आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता आहे..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल सर्व विभागांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना काही सूचनाही केल्या आहेत. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशी सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना आणि स्थानिक प्रशासनाला केली आहे. देशाबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांबाबतची नियमावलीही आज जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे

मुंबई महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागामार्फत आज, 29 नोव्हेंबरला महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासमोर सादर होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शाळांविषयी जो निर्णय होईल त्यानुसार आयुक्तांकडून मुंबईतील शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई महापालिकेने शाळा सुरू करण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे.

शिक्षण विभागाकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांतही सर्व शाळा सुरू होणार असल्याने आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व शाळा, जिल्हे, महापालिका, नगरपालिका, छावणी बोर्ड यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील शाळांसंदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.