Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार बुधवारी सायंकाळी समाप्त झाला. त्या टप्प्यात १३ राज्यांमधील लोकसभेच्या ८८ जागांसाठी शुक्रवारी (२६ एप्रिल) मतदान होईल. मतदान प्रक्रियेला सामोऱ्या जाणाऱ्या जागांमध्ये महाराष्ट्रातील ८ जागांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांतील बड्या नेत्यांचे भवितव्य ठरेल.
पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांसाठी मागील शुक्रवारी मतदान झाले. त्या टप्प्यात सुमारे ६५.५० टक्के मतदारांनी हक्क बजावला. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाविषयी उत्सुकता आहे.
त्या टप्प्यात केरळमधील सर्व २० जागांसाठी मतदान होईल. त्या राज्यातून राहुल (वायनाड) आणि कॉंग्रेसचे हाय-प्रोफाईल नेते शशी थरूर (थिरूवनंतपूरम) निवडणूक लढवत आहेत. थरूर यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भाजपचे उमेदवार म्हणून दंड थोपटले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात कर्नाटकमधील १४, तर राजस्थानातील १३ जागा मतदानाला सामोऱ्या जाणार आहेत. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील प्रत्येकी ८ जागांसाठी मतदान होईल. उत्तरप्रदेशातील प्रमुख उमेदवारांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि ज्येष्ठ अभिनेते अरूण गोविल (दोघेही भाजप) यांचा समावेश आहे.
कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांचे भवितव्य ठरेल. मध्यप्रदेशातील ६, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी ५, छत्तिसगढ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ३ जागांसाठी मतदार हक्क बजावतील. तसेच, मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी १ जागेवर मतदान होईल.