पुणे : जिल्हा बॅंक निवडणुकीचा बिगुल

पुणे – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. या बॅंकेत आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ताकद पणाला लावावी लागणार आहे. त्याचवेळी बॅंकेत शिरकाव करून सहकार क्षेत्रात चंचुप्रवेश करण्यासाठी भाजप उत्सुक असल्याने तेही आपली ताकद पणाला लावण्याची शक्‍यता आहे. सोमवारपासून (दि.29) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, तर मतदान दि.2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

यापूर्वी बॅंकेची निवडणूक मार्च 2015 ला झाली होती. निवडणूक 2020 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य शासनाने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत सहकार विभागातले अधिकारी व्यस्त असल्याचे कारण देत बॅंकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. यानंतर मार्चमध्ये आलेले करोनाचे संकट यामुळे या निवडणुका आणखी लांबणीवर गेल्या. आता करोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बॅंकेची निवडणुका घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

“पीडीसीसी’ बॅंक ही सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. शताब्दी महोत्सव पूर्ण करणाऱ्या या बॅंकेच्या 294 शाखा असून ग्रामीण भागाची अर्थवाहिनी बॅंकेचा लौकिक आहे. या बॅंकेवर संचालक असलेले अनेक जण आमदार झाले आहेत. तर, काहींनी विधानसभेची निवडणूकसुद्धा लढविली आहे. या बॅंकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून तालुक्‍याच्या राजकारणात सक्रिय राहता येते. त्यामुळे बॅंकेवर संचालक म्हणून जाण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे.

21 संचालक पदासाठी निवडणूक
“पीडीसीसी’ बॅंकेच्या 21 संचालक पदासाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वाधिक संचालक हे “अ’ मतदारसंघ तालुका प्रतिनिधी यामधून 13 संचालक निवडले जाणार आहे. तर, “ब’ मतदारसंघ – 1, “क’ मतदारसंघ -1, “ड’ मतदारसंघ -1, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी -1, इतर मागास वर्ग प्रतिनिधी-1, वि.जा/भ.ज./वि.मा.प्र. मतदारसंघ -1, आणि महिला प्रतिनिधी 2.

वर्चस्वासाठी सहकार,
राजकीय क्षेत्रात जोरदार तयारी

जिल्हा बॅंक ही जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाची सहकारी संस्था समजली जाते, त्यामुळे या बॅंकेवर वर्चस्व ठेवण्यासाठी मोठी साठमारी होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असे हाय प्रोफाइल नेते या
संचालक मंडळात आहेत. सद्य:स्थितीत या बॅंकेच्या संचालक मंडळात सहा आमदार आहेत. जिल्हा बॅंकेवर वर्चस्व ठेवण्यासाठी सहकार आणि राजकीय क्षेत्रात जोरदार तयारी सुरू आहे.

…असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल   दि. 29 नोव्हेंबर ते दि. 6 डिसेंबर 2021
उमेदवारी अर्जांची छाननी  दि. 7 डिसेंबर 2021
पात्र उमेदवार अर्ज प्रसिद्ध  दि. 8 डिसेंबर 2021
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत  दि. 8 ते 22 डिसेंबर 2021
अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध व चिन्ह वाटप  दि. 23 डिसेंबर 2021
मतदान  दि. 2 जानेवारी 2022
मतमोजणी  दि. 4 जानेवारी 2022

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.