मुंबई – मंत्री नवाब मलिक व राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोपप्रत्यारोपांच्या मालिकेत आज नवा अध्याय जोडला गेला. फडणवीस यांनी यापूर्वी दिवाळीनंतर ‘बॉम्ब’ फोडणार असल्याचे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे आरोप करत काही ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांचे पुरावे सादर केले. मलिक यांच्यावर आरोप करतानाच फडणवीस यांनी राज्याचे माजी गृहमंत्री व दिवंगत नेते आर आर पाटील यांच्यावर २०१०मध्ये करण्यात आलेल्या आरोपांबाबत देखील वक्तव्य केले आहे.
२०१०मध्ये आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना दाऊद गँगचा सदस्य सलीम पटेल याच्यासोबतचे त्यांचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंवर आर आर पाटील यांच्यावर अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा आरोप झाला होता. याबाबत भाष्य करताना फडणवीस यांनी आज त्या प्रकरणाशी आर. आर. पाटील यांचा संबंध नसल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
आर. आर. पाटील यांच्यावर अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे आरोप
२०१०च्या सप्टेंबर महिन्यात राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील ईदनिमित्त अल्पसंख्याक आयुक्त नसीम सिद्दिकी यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला गेले होते. यावेळी ईदच्या पार्टीसाठी सलीम पटेल आणि मुबीन कुरेश देखील उपस्थित होता. यावेळी पाटील यांचे सलीम पटेल आणि मुबीन कुरेशीसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून आर. आर. पाटील यांच्यावर अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे आरोप देखील झाले होते.
नेमकं काय आहे प्रकरण?
सलीम पटेल हा दाऊद गँगचा सदस्य आहे. तो दाऊदची बहीण हसीना पारकरचा बॉडिगार्ड, ड्रायव्हर आणि फ्रंटमॅन देखील होता. हसीना पारकरला २००७मध्ये अटक झाली, तेव्हा सलीम पटेलला देखील अटक झाली. हसीना पारकरच्या नावे सलीम पटेलच खंडणीचे व्यवहार करायचा असं सांगितलं जातं.
काय म्हणाले फडणवीस?
आज पत्रकारपरिषदेमध्ये बोलताना फडणवीस यांनी, “मोहम्मद अली इशाक पटेल उर्फ सलीम पटेल. आर. आर. पाटील एका इफ्तार पार्टीमध्ये गेले होते तेव्हा त्यांचा या गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल झाला होता. त्यात त्यांचा दोष काही नव्हता. पण ज्या दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो व्हायरल झाला, तो हा सलीम पटेल. तो हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर, फ्रंटमॅनही होता. हसीना पारकरला २००७मध्ये अटक झाली, तेव्हा सलीम पटेललाही अटक झाली. दाऊदनंतर हसीना पारकरच्या नावाने संपत्ती गोळा केली जायची” असं स्पष्ट केलं.