मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 10 डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार असून 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या एकूण आठ जागांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. मात्र सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईच्या दोन जागांसह कोल्हापूर, धुळे, नागपूर, अकोला या सहा विधान परिषद मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. रामदास कदम (मुंबई, शिवसेना), भाई जगताप (मुंबई, काॅंग्रेस), सतेज पाटील (काॅंग्रेस, कोल्हापूर), अमरिश पटेल (भाजप, धुळे-नंदुरबार), गिरीश व्यास (भाजप, नागपूर), गोपालकिशन बाजोरिया (शिवसेना, अकोला) यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे. तर, प्रशांत परिचारक (भाजप, सोलापूर) व अरूणकाका जगताप (राष्ट्रवादी, अहमदनगर) या दोन जागांसाठी निवडणूक होणार नाही. दरम्यान, या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकार एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार याबाबत उत्सुकता आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम –
-अधिसूचना जाहीर – 16 नोव्हेंबर
-अर्ज दाखल करण्याची तारीख – 23 नोव्हेंबर
-अर्ज छाननी – 24 नोव्हेंबर
-अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 26 नोव्हेंबर
-मतदान – 10 डिसेंबर
-मतमोजणी / निकाल – 14 डिसेंबर