कोपरगाव -वयाच्या नव्वदीत पोचल्यावर माणसाला स्वतःची चिंता जास्त असते. शरीर थकल्याने साथ देत नसते, विविध व्याधींनी व्यक्ती त्रस्त झालेली असते. मात्र याला माजी मंत्री शंकरराव कोल्हे अपवाद ठरले आहेत. वयाच्या नव्वदीत असतानाही ते सतत कार्यमग्न आहेत. स्वतःपेक्षा जनमाणसांची सेवा करीत त्यांच्यात वावरण्यातच त्यांना आनंद वाटतो. वयाने थकले, तरीही त्यांची दैनंदिन कृती, विचार, कल्पकता तरुणांना लाजवणारी आहे. आजही ऑनलाइन बैठकांत भाग घेऊन मार्गदर्शनही करत आहेत.
मनात प्रचंड ऊर्जा आणि जनमाणासांच्या कल्याणासाठी दूरदृष्टीने विचार मांडणारे व्यक्तिमत्त्व, अशी खास ओळख माजी मंत्री सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांची आहे. सहकार क्षेत्राचे गाढे अभ्यासक, राज्याच्या पाटपाण्याच्या संदर्भातील सखोल जाणकार असल्याने राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असले, तरी कोल्हे यांच्या अभ्यासपूर्ण प्रदीर्घ अनुभवाचा सल्ला घेतला जातो. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहकार क्षेत्रातील आढचणींच्या काळात शंकरराव कोल्हे यांचे मार्गदर्शन घेत असतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट्सच्या (व्हीएसआय) गव्हर्निंग कौन्सिलची बैठक झूम ऍपद्वारे घेण्यात आली. ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, साखर आयुक्त सौरव राव, आ. रोहित पवार यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर ऑनलाइन उपस्थित होते.
‘साखर उद्योग आणि उद्याचा महाराष्ट्र’ या संदर्भात कोल्हे यांनी वयाच्या नव्वदीत अभ्यासपूर्ण मांडणी करुन सहकार क्षेत्रातील सध्याच्या आडचणींवर मात करुन भविष्यातील सहकार क्षेत्रासह साखर उद्योगाची स्थिती काय असू शकते, यावर अनेक पर्याय सूचवून योग्य दिशादर्शक मार्गदर्शन केले.
उतारवयातही कोल्हे दररोज वर्तपत्र वाचन, लिखान, कार्यालयीन कामकाज, बैठका घेणे, सार्वजनिक कार्यक्रमांना जावून मार्गदर्शन करीत असतात. दररोज पहाटे उठून व्यायाम करणे, शेतीवर जाणे, शाळा, महाविद्यालयांत जावून माहिती घेवून योग्य सल्ला देणे, हा त्यांचा दिनक्रम असतो. कोल्हे यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी त्यांचा आदर्श घेतल्याने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्राच्या कामकाजात कोल्हे परिवाराचे कार्य प्रभावी आहे. शरीराने थकलेला हा नेता आजही मनाने व कार्याने किती तरुण आहे, हे कोल्हे यांच्या कृतीतून दिसते.