Akhilesh Yadav । Lok Sabha Election 2024 – भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील मतदान बूथ लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरेाप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे.
या परिसरात पोलिस यंत्रणा पक्षपातीपणा करीत असून ते विरोधी पक्षांच्या लोकांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. या मतदार संघात अखिलेश यांच्या पत्नी व विद्यमान खासदार डिंपल यादव या रिंगणात आहेत.
ते म्हणाले, काही ठिकाणांहून सरकार बळाचा वापर करत असल्याच्या बातम्या येत आहेत. मतदान केंद्राबाहेर त्यांचे हुकुम मानणारे अधिकारी तैनात करण्यात आल्याचे ऐकायला मिळत आहे.
कडक उन्हाळ्यात होत असलेल्या निवडणुकांवर यादव यांनी प्रश्न उपस्थित केले, लोकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी हे केले जात असल्याचे ते म्हणाले. या मतदार संघातून डिंपल यादव पाच लाख मतांनी निवडून येतील असा दावाही त्यांनी केला.