मॉस्को – रशियाचे अध्यक्ष म्हणून पुतीन यांची पाचवी टर्म आजपासून सुरू झाली. मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली होती. राजकीय विरोधकांना संपवल्यानंतर पुतीन यांनी रशियाच्या राजकारणावर पुतीन यांची पकड आता अधिकच घट्ट झाली आहे.
पुढील ६ वर्षांसाठी पुतीन यांची ही राजकीय पकड अधिकच घट्ट झालेली असणार आहे. विशेषतः युक्रेन युद्धामुळे पुतीन यांनी सर्व सत्ता आपल्या हातात एकवटली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या पाव शतकापासून पुतीन रशियाचे अध्यक्ष आहेत. रशियाच्या इतिहासात जोस स्टॅलिन यांच्यानंतर पुतीन हे सर्वाधिक काळासाठीचे अध्यक्ष ठरले आहेत. त्यांची अधअयक्षपदाची कारकिर्द आता २०३० पर्यंत राहणार आहे. त्यानंतरही अध्यक्ष होण्यास ते आता राज्यघटनेनुसार पात्र असणार आहेत.
ग्रँड क्रेमलिन पॅलेसमधील समारंभात पुतीन यांनी रशियन राज्यघटनेच्या साक्षीने राज्यघटनेचे रक्षण करण्याचे वचन दिले. या समारंभाला फारच थोडे उच्च अधिकारी उपस्थित होते.
या पाचव्या टर्ममध्ये पुतीन यांच्यापुढे अनेक नवीन आव्हाने आहेत. युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर मोठे निर्बंध घातले आहेत. यामुळे रशियाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. यामुळे रशियाला चीन, इराण आणि उत्तर कोरिया या जुन्या मित्र देशांच्या मदतीवर विसंबून रहावे लागते आहे.
युद्धात रशियाची शस्त्रे, दारुगोळा आणि मनु,यबळाचीही मोठी हानी झाली आहे. युक्रेनच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे रशियाच्या अंतर्गत भागतही असुरक्षितता निर्माण झाली आहे. आता नाटो देखील रशियाविरोधात मोर्चेबांधणी करू लागल्यामुळे रशियाला यापुढच्या काळात मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
२०१८ मध्ये अध्यक्ष होताना रशियाच्या अर्थकारणाला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देण्याची ग्वाही पुतीन यांनी दिली होती. मात्र त्या ऐवजी लष्करी बळावर पूर्व आशियामध्ये आपली स्थान बळकट करण्याचा प्रयत्नच पुतीन यांनी केला.
आता पुतीन यांच्या अध्यक्षपदाच्या ६ वर्षांच्या कार्यकाळात युद्धासाठीचा निधी जमा करण्यासाठी करांमध्ये मोठी वाढ केली जाईल आणि सर्व सामान्यांना सैन्यामध्ये भरती होण्याची सक्ती केली जाईल, अशी भीती सामान्य जनतेमध्ये आहे.