विविध क्षेत्रांतील ग्राहकांशी ऑनलाइन बैठक
पुणे – मध्य रेल्वेकडून सध्या सुरू असणाऱ्या मालवाहतुकीच्या अनुषंगाने ग्राहकांशी ऑनलाइन बैठक घेतली. यावेळी पुढील पाच वर्षांमध्ये मालवाहतुकीमध्ये वाढ करणे, लोडिंगमध्ये वाढ करणे आदी विषयांवर चर्चा झाली.
भारतीय रेल्वे लॉकडाऊनच्या कालावधीत प्रवासी वाहतुकीला स्थगिती देण्यात आली आहे. या कालावधीत केवळ मालगाड्या, विशेष प्रवासी गाड्या, श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात येत होत्या. मार्चमहिन्यापासून मध्य रेल्वेकडून लाखो टन साहित्याची वाहतूक करण्यात आली. या अनुषंगाने मध्य रेल्वेकडून माल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा केली. याबैठकीत कोळसा, स्टील, खते, तेल, सिमेंट, ऑटोमोबाइल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंटेनर ट्रेन ऑपरेटर्स उपस्थित होते.
मध्य रेल्वेचे प्रमुख मुख्य वाणिज्य व्यवस्थापक बी.के. दादाभोय, मुख्य प्रधान परिचालन व्यवस्थापक डी.के.सिंह, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक(माल विपणन) पी.के.रानडे यांसह माल यातायात, माल विपणन, वित्तीय सल्लागार यांसह मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विविध भाडे योजना, समस्या आदींबाबत कंपन्यांनी देखील हे मुद्दे मांडले. याबाबत प्रशासनाकडून देखील त्वरित कार्यवाही करणार येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.