पिंपरी – पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्विकास, शहरातील अतिक्रमण काढा, महापालिका रुग्णालयात औषधे, मनुष्यबळ, आरोग्य सुविधांमध्ये त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्या. तसेच पवना धरण शंभर टक्के भरले असले तरी आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशा सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना केल्या. तसेच पवार यांनी दापोडी-निगडी कॉरिडॉरचाही आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी (दि.14) आढावा बैठक घेतली. या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांचा आढावा पवार यांनी घेतला. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शाम लांडे, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी-निगडी कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. ते म्हणाले, रस्त्याच्या बाजूला दोन झाडांच्यामध्ये अधिक जागा असल्यास तेथे वृक्षारोपण करावे, प्रामुख्याने स्थानिक प्रजातीची झाडे वापरावी. पदपथाच्या बाजूला असणारी हिरवळ आणि फुलझाडांचे नीट जतन होईल याचे सुरुवातीपासून नियोजन करावे. पदपथावर आलेले अतिक्रमण काढण्यात यावे. तसेच कामादरम्यान रस्त्याच्या बाजूला होणारे अतिक्रमण तात्काळ काढावे. पूल आणि मेट्रोमार्ग परिसरात सुशोभीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. कामांची देखभाल दुरुस्ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी उत्तम दर्जाची सामुग्री वापरावी. दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. पवार यांनी पालकमंत्रीपदाची सूत्रे स्विकारताच 24 तासांच्या आतच शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नाचा आढावा घेत त्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.