शंकर दुपारगुडे
कोपरगाव – राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेना-भाजपची युती होणार की नाही, कोपरगाव मतदारसंघांतून काळे-कोल्हे हे कोणत्या पक्षांकडून निवडणूक लढवतील? कोणाला कोणत्या पक्षातून तिकीट मिळणार की आमदार स्नेहलता कोल्हे यांचे भाजप तिकीट कापणार? आशुतोष काळे राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून काही दिवसांसाठी अलिप्त असल्यामुळे ते शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये जाणार? भाजपमधून राजेश परजणे, विजय वहाडणे यापैकी कोणाला तिकीट मिळणार?
यावर मतदारसंघामध्ये तर्कवितर्क सुरू होते. अखेर भाजपच्या वतीने पहिल्या यादीमध्ये स्नेहलता कोल्हे यांचे नाव जाहीर झाल्याने बंड करणारे थंड झाले आहेत. तसेच आशुतोष काळे यांची भूमिका अद्यापही अस्पष्ट असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले काळे आणि कोल्हे यांनी अर्ज भरण्याचे काही दिवस शिल्लक असताना त्यांची भूमिका स्पष्ट दिसत नसल्यामुळे मतदारसंघामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. आज दिल्ली येथे भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 125 उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली.
त्यामध्ये आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव कोपरगाव मतदारसंघातून जाहीर करण्यात आले. आमदार कोल्हे यांना भाजप पक्षातून अंतर्गत विरोध आहे. त्यांना तिकीट मिळणार नाही, त्या शिवसेना पक्षाकडून लाढणार आहेत किंवा अन्य पक्षात जाण्याची शक्यता आहे, अशा चर्चा त्यांच्या विरोधकांनी सुरू केल्या होत्या. त्यांना तिकीट मिळू नये, यासाठी काहींनी अटोकाट प्रयत्न केले. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांची दखल घेत पहिला यादीत नाव जाहीर करून कोल्हे विरोधाकांची निराशा करीत बंड थंड केले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची पहिली यादी जाहीर झाली. त्यात कोल्हे यांचे नाव आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांमध्ये स्वतःच्या विचाराचे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असताना त्यांच्या विचाराला पक्षश्रेष्ठींनी बाजूला सारत विद्यमान आमदारांना संधी दिली की विखे यांची नवी राजकीय खेळी आहे, यावर तर्क लावले जात आहेत.दरम्यान, कोल्हे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करणारे परजणे, वहाडणे यांच्यासमोर अपक्ष की इतर पक्षातून उमेदवारी करावी, हा प्रश्न उभा ठाकला आहे.
अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत त्यांची भूमिका गुलदस्त्यात राहील. तर कोल्हे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आशुतोष काळे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरून रिंगणात उतरणार की अन्य कोणता निर्णय घेणार, हे मात्र अजून अस्पष्ट आहे. कोल्हे यांच्या प्रमाणे काळे यांचा निर्णय तितकाच महत्त्वाचा आहे. आशुतोष काळे यांच्या भूमिकेवर कोपरगाव मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.