“लॉकडाऊन’ : जिम सुरू करण्यासाठी नागरिक, चालक आग्रही
पिंपरी – सध्याच्या धकाधकीच्या काळात व्यायाम महत्त्वाचा आहे. त्यासाठी एलिकडे जिम संस्कृती वाढली आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या “लॉकडाऊन’मुळे जिम बंद असल्याने तरुणांबरोबरच जिमचालकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
वातावरणातील बदल, वाढती व्यसनाधिनता, सकस आहाराचा अभाव, कौटुंबिक ताणतणाव यामुळे ढासळत चाललेले मानसिक आणि शाररिक संतुलन यावर उपाय म्हणून जिम महत्त्वाची आहे. तसेच सदृढ शरीर व तंदुरुस्त मनासाठी व्यायामाची आवश्यकता आहे. पिळदार शरीराची “क्रेझ’ वाढत असल्याने तरुण, तरुणी जिमकडे आकर्षित होत आहेत. शहरात सुमारे दोनशे ठिकाणी जिम आहेत.
वैद्यकीय उपचाराचा भाग म्हणून विकलांग, मधुमेह, अपघातांमुळे विविध अवयवांवर झालेल्या आघातांसाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. वाढते “फॅड’ पाहून शहरात सुशिक्षित तरुणांनी कर्ज काढून जिम काढल्या आहेत. यामध्ये सुमारे 25 लाखापर्यंतची गुंतवणूक केली आहे.
जिमकडे तरुण-तरुणी आकर्षित होण्यासाठी त्यावर भरमसाठ खर्च केला आहे. अनेक जणांनी वाताणुकूलित जिम उभारल्या आहेत. मात्र करोनामुळे सगळेच ठप्प झाल्याने जिमचालकांचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेल्या जिम सुरु करण्याची मागणी जिम चालक करत आहेत. सामाजिक अंतराचे पालन करून जिम सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.