वाघोली(प्रतिनिधी) : वाघोली येथे सापडलेल्या कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची खाजगी लॅबमध्ये केलेल्या कोरोना टेस्ट मध्ये लोणीकंद येथील एका २७ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्याने लोणीकंद व वाघोलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोणीकंदमध्ये ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे.
खाजगी लॅब मध्ये केलेल्या कोरोना टेस्ट रिपोर्टमध्ये वाघोली येथील चार जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेले आहे. कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जवळपास १०० जणांची तपासणी करण्यात आली आहे. चौघांच्याही कुटुंबांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. वाघोलीतीलच एका पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोणीकंद येथील काही जणांची तपासणी केल्यानंतर मंगळवारी (दि.२१) एका तरुणाचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. तरुणाची माहिती घेऊन पुढील उपचारासाठी पुणे शहरामध्ये पाठविण्यात येत आहे. या तरुणाच्या संपर्कात आलेल्यांची देखील माहिती घेऊन खाजगी लॅबमध्ये टेस्ट करण्यात येत आहे.
लोणीकंद येथील तरुणाचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर लोणीकंद ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. नियमित औषध फवारणीसह सर्व दुकाने ग्रामस्थांनी बंद केली आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वाघोलीतील तिघांचे एनआयव्ही रिपोर्ट पॉजिटीव्ह
वाघोली येथे सुरुवातीच्या काळामध्ये सापडलेल्या तिघांचे कोरोना रिपोर्ट खाजगी लॅबमध्ये पॉजिटीव्ह आले होते. यानंतर शासकीय एनआयव्ही लॅबमध्ये तिघांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. तिघांवर उपचार सुरु असून तसेच चौथ्या व्यक्तीवर देखील उपचार केले जात आहेत.