नवी दिल्ली : रॅपिड टेस्ट किटस्च्या निकालात काही तफावत आढळत असल्याने हे किटस् वापरू नयेत अशी सूचना भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने केली आहे. हे किटस् दोन दिवस वापरू नयेत. त्याच्या निकालात तफावत आढळत आहे. त्याच्या चाचण्या घेऊन त्याबाबत दोन दिवसांत मार्गदर्शक सूचना करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.
देशात आजअखेर चार लाख 49 हजार 810 जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील 35 हजार 852 चाचण्या काल घेण्यात आल्या. काल घेतलेल्या चाचण्यांपैकी आयसीएमआरच्या 201 लॅबद्वारे 29 हजार 776 तर खासगी लॅबद्वारे सहा हजार 76 चाचण्या घेण्यात आल्या.
महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिमसह देशातील आणखी 61 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत एकही करोनाबाधित आढळला नाही. देशात करोनामुक्त झालेल्या तीन हजार 252 जणांपैकी 705 जण काल करोनामुक्त झाले. त्यामुळे करोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 17.48 टक्के झाले आहे. देशात करोनाबाधितांची संख्या 18 हजार 601 एवढी आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.