करोना बाधितांना तात्काळ उपचार मिळणार
पुणे – करोना बाधितांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी पुण्यात जम्बो हॉस्पिटल उभारले आहे. कमी वेळेत एवढे मोठे हॉस्पिटल उभारणे कौतुकास्पद आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन केले, मात्र येथे येण्याची वेळ पुणेकरांवर येऊ नये. हे जम्बो हॉस्पिटल तसेच पडून राहिले तरी चालेल, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना केली. गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत, तीच पुढेही घ्यावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या 800 बेड्सच्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, करोनाबाधितांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरू असून पावसाळा, करोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. करोनामुळे सर्वधर्मीयांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी परदेशांतून नागरिक येतात. गणेशाची प्रतिष्ठापना आपण केली आहे. मात्र, यंदा आपल्यासमोर करोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकर मुक्ती मिळावी, तसेच सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूया.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे, त्यामुळेच पुण्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊस सुरू असताना अत्यंत कमी कालावधीत या कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. या रुग्णालयामुळे कोविड रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ होणार असून पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील रुग्णाला या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे.
पुणेकरांनो, काळजी घ्या
मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन झाले तरी, रुग्णांना मंगळवारपासून प्रत्यक्ष उपचार मिळणार आहेत. सेंटरमधील सुविधांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे लगेचच रुग्णांवर उपचार होणार नाहीत. त्यामुळे सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.