सखारामनगरातील एक पॉझिटिव्ह : प्रशासनाची डोकेदुखी वाढली
थेऊर (प्रतिनिधी) – पूर्व हवेलीमध्ये करोनाचा कहर सुरुच असून थेऊरमधील सखारामनगर भागातील एकास करोनाची बाधा झाल्याने येथील स्थानिक रुग्णांची संख्या 7 झाली आहे. कमी जागेत दाट लोकवस्ती असलेल्या भागात करोनाचा झालेला शिरकाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे थेऊरकरांची चिंता वाढली आहे.
“थेऊरमधील सखारामनगर भागात करोनाचा सातवा रुग्ण आढळून आला आहे. त्यांचे संपर्कातील घरातील इतर सदस्यांना होमक्वारंटाइन करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावे विनाकारण घराबाहेर पडू नये.
– मेहबूब लुकडे, वैद्यकीय अधिकारी, कुंजीरवाडी
सखारामनगर हा भाग दाट लोकवस्ती असलेला भाग आहे. यामध्येच करोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
“बाधित रुग्णाच्या घरातील व इतर संपर्कातील 20 जणांच्या घशातील द्रव नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवणार असून सर्वांना सक्तीने होमक्वारंटाइन करीत आहोत. सखाराम नगरमधील सर्व रस्ते बंद करणार असून संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
– बी. आर. कांबळे, ग्रामविकास अधिकारी, थेऊर
थेऊरमधील सापडलेला पहिला रुग्ण व त्याचे संक्रमणातून अन्य पाच जणास करोनाची बाधा झाली आहे. पहिल्या रुग्णाच्या घरापासून अवघ्या 200 फूट अंतरावर रविवारचा रुग्ण सापडला असल्याने संक्रमणाची व्याप्ती वाढू लागली आहे.