नव्याने 1,599 बाधित सापडले : दिवसभरात 779 डिस्चार्ज
पुणे – शहरात करोनाने दररोज सरासरी 30 हून अधिक बाधितांचा मृत्यू होत आहे. गुरुवारी (दि. 23) 36 जणांचा मृत्यूंची नोंद झाली असून, यात दिवसभरात झालेल्या 23 जणांचा समावेश आहे. तर अन्य मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता 1,104 झाली आहे.
शहरात स्वॅब (आरटी-पीसीआर) आणि रॅपिड ऍन्टिजेन टेस्टची संख्या वाढल्यामुळे दररोजची तपासणी संख्या सात हजारांवर पोहचली आहे. गुरुवारी दिवसभरात 6 हजार 665 संशयितांची तपासणी करण्यात आली. तर, दिवसभरात नव्याने 1 हजार 599 बाधित सापडले असून, बाधितांची संख्याही 44 हजार 65 वर पोहोचली आहे.
मागील दोन दिवसांत केलेल्या तपासणी अहवालातून ही बाधित संख्या समोर आली आहे. बाधित संख्येबरोबर अत्यवस्थ बाधितांची संख्या 589 झाली असून, त्यातील 82 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. तर 507 बाधित अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांत एकूण 17 हजार 53 बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात 779 जणांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत 25 हजार 908 जण करोनामुक्त झाले आहेत.
महापालिकेत दुसऱ्या दिवशीही 12 पॉझिटिव्ह
महापालिका भवनमधील कर्मचाऱ्यांच्या करोना रॅपिड टेस्टदरम्यान सलग दुसऱ्या दिवशी 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील दोघांचा समावेश असून, आरोग्य विभागातील सहा, आस्थापना विभागाकडील 3 आणि मालमत्ता विभागाकडील एका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या बाधितांत करोनाची लक्षणे नसल्याचे सांगण्यात आले.