कोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले : जाधव

पुणतांबा – पंचवीस वर्षापासून ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी पुणतांबेकर यांचा पाणीप्रश्‍न सोडला नाही, फक्त आश्‍वासने दिली. मात्र आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पुणतांबेसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून योजनेचे कामाला सुरुवात झाली.

आमदार कोल्हे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण केले. त्यामुळे मतदारांनी विकासाला म्हणजेच आमदार स्नेहलता कोल्हे यांना साथ द्यावी असे आवाहन युवक नेते धनंजय जाधव यांनी केले. पुणतांबा येथे महायुतीच्या उमेदवार कोल्हे यांच्या प्रचारार्थ जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी गणपत वाघ होते. यावेळी डॉ. मिलिंद कोल्हे, संजीवनीचे उपाध्यक्ष बाळासाहेब वक्ते, सर्जेराव जाधव, ऍड. रामभाऊ डोके, चंद्रकांत वाटेकर, शिवसेनेचे आबासाहेब नळे, शहर प्रमुख महेश कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष अमोल सराळकर, रिपाईचे गौतम थोरात, सतीश रोकडे, गणेश बनकर, संभाजी गमे, दीपक वाढणे, संजय रोकडे आदी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, जे पंचवीस वर्षे सत्तेत होते त्यांनी प्रत्येक निवडणुकीत पाणीप्रश्‍नावर राजकारण करून पाणीप्रश्‍नाला बगल दिली. पुणतांबेकर यांना विकासापासून दूर ठेवले. मात्र गेल्या पाच वर्षाच्या काळात आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गावाचा पाणीप्रश्‍न कायमचा मिटवण्यासाठी 17 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करून या योजनेच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे या गावाचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे.

आमदार कोल्हे यांनी विकासकामे करून गावासाठी मोठा निधी दिला. त्याच्यातून विविध विकासकामे मार्गी लागली. ज्यांनी दहा वर्ष लोकप्रतिनिधित्व केले त्यांनी काय दिवे लावले हे जनतेला माहीत आहे. येणारी निवडणूक ही विकासाच्या मुद्‌द्‌यावर होणार असून आमदार कोल्हे यांनी पुणतांबा परिसरातील अकरा गावात विकासकामे केली. विरोधक अपप्रचार करून जनतेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे, जनता त्यांना थारा देणार नाही. येणाऱ्या काळात पुणतांबा व परिसरातील विकासकामासाठी आमदार कोल्हे सदैव प्रयत्नशील राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.