मतदारसंघातील हजारो भाऊ मोनिकाताईंच्या पाठीमागे : धस

पाथर्डी  – स्व. राजीव राजळे दुर्दैवाने या निवडणुकीत तुमच्याबरोबर नाहीत म्हणून मोनिकाताई तुम्ही काळजी करू नका. मतदारसंघातील हजारो भाऊ तुमच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत. माजी आमदार आप्पासाहेब राजळे व स्व. माजी आमदार राजीव राजळे यांचे मतदारसंघात मोठे योगदान आहे.

तुम्ही पाच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे मतदार तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहेत असा विश्‍वास माजी मंत्री सुरेश धस यांनी पाथर्डी येथे बोलताना व्यक्त केला. शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या पाथर्डीतील प्रचाराच्या सांगता सभेत धस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार मोनिका राजळे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी धस म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जनतेत राहिलेला नाही. हा फक्त फेसबुक, व्हाट्‌सअप व फेक अकाउंट पुरता शिल्लक आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सांगतात आम्ही निवडून आलो. मात्र या मतदारसंघात नामदार मुंडे यांचे हेलिकॉप्टर आल्यानंतर कोणाचेच काही चालत नाही.राष्ट्रवादीचे शेवगावचे नेते चंद्रशेखर घुले हुशार आहेत, त्यांना यावेळी या मतदारसंघात भाजप सोडून काही होणार नाही हे माहिती होते त्यामुळे त्यांनी काकांचा (प्रताप ढाकणे) बळी दिला आहे.

अंदर की बात सांगतो इथली 75 टक्के राष्ट्रवादी आमच्या बरोबर आहे. त्यामुळे काका तुमचा काही उपयोग होणार नाही. पुढारी स्वतःला खूप हुशार समजत असतील तरीही जनता काकणभर हुशार आहे. सर्वांना हो म्हणतील मात्र मनात जिथे असेल तिथेच मत देतात. आम्हा सारख्या पुढाऱ्यांना आमदारकी व खासदारकीचा झुल पाच वर्षासाठी मायबाप जनता घालत असते. आमदार मोनिकाताईने गेल्या पाच वर्षात चांगले काम केलेले असल्याने मतदार त्यांना नक्कीच कौल देईल असा विश्‍वास धस यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात विरोधकावरसुद्धा आपण वैयक्तीक पातळीवर टीका केली नाही. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. तरीही निवडणूक प्रचारात व्यक्ती द्वेषातून माझ्यावर व माझ्या कुटुंबावर खालच्या पातळीवर आरोप केले जात आहेत. विरोधक कितीही बोलत असले तरी साडेचार वर्षे ते झोपलेले होते. त्यांना उठवण्याचे काम करण्यात आले आहे.

जाग झाल्यानंतर त्यांना मतदारसंघातील शेतकरी, पाणीप्रश्‍न, आपली जात आठवू लागली आहे. राजकारणात तरुणांचा कुठल्या मर्यादेपर्यंत वापर करायचा याचा विचार विरोधकांनी करायला हवा. विरोधकांकडे मार्केट कमिटीची एकच संस्था आहे. त्या संस्थेचा कारभार कसा चालतो हे सर्वांना माहीत आहे. आमचे कुटुंब सहा नाही तर हजारो लोकांचे आहे. तुम्हा सर्वांच्या पाठबळामुळे मी पुन्हा उभी राहिले. सर्वांच्या सहकार्याने हे सर्व काम करू शकले. यापुढील काळात सर्वांसाठी काम करत राहणार आहे. शेवटी भावनेवर राजकारण चालत नाही. आपला ऊसतोडणी कामगारांचा दुष्काळी तालुका आहे. या तालुक्‍याच्या शेवटचे गाव बागायती करण्यासाठी आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही राजळे यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.