कोलंबो – श्रीलंका संघातील खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत करोनाची बाधा झाल्यामुळे आता ते स्वतःची काळजी घेताना दिसत आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी सुरू झालेल्या श्रीलंका संघाच्या सरावात प्रशिक्षकांनी चक्क पीपीई किट परिधान करून उपस्थिती राखली होती.
भारत व श्रीलंका यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला येत्या रविवारपासून प्रारंभ होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने तसेच तीन टी-20 सामने खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्याहून परतलेल्या श्रीलंका संघाचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून खेळाडू सरावासाठी मैदानात उतरले आहेत.
श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅंट फ्लॉवर व डेटा ऍनलिस्ट जीटी निरोशन यांना करोनाची बाधा झाली होती. हाच धोका होऊ नये यासाठी सपोर्ट स्टाफमधील अन्य प्रशिक्षकांनी संघाच्या सरावादरम्यान पीपीई किट घालून सरावाला उपस्थिती राखली होती. श्रीलंका क्रिकेट मंडळानेच सरावाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
13 जुलैपासून या मालिकेला प्रारंभ होणार होता. मात्र, श्रीलंकेच्या खेळाडूंना विलगीकरणात पाठवल्यामुळे ही मालिका आता रविवारपासून सुरू होत आहे. या मालिकेतील सर्व सामने कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवरच खेळवले जाणार आहेत.