जिनेव्हा – जगभरातील करोना बाधितांची आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या पुन्हा वाढली असून करोनाची तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.
आपातकालीन समितीच्या बैठकीत बोलताना टेड्रोस घेबरेयसीस म्हणाले की, दुर्दैवाने आपण आता तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. डेल्टा व्हेरिएंट आता 111 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. विषाणू सतत आपले स्वरुप बदलत आहे, परिणामी आणखी संसर्गजन्य व्हेरिएंट उदयास येत आहेत.
उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये लसीकरणाच्या वेगवान गतीमुळे संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये आणि मृत्यूंमध्ये घट झाली होती, पण तेथील बाधितांची संख्या आता पुन्हा वाढू लागली आहे. जगभरात पुन्हा एकदा करोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.
गेल्या आठवड्यात सलग चौथ्या आठवड्यात बाधितांच्या संख्येमध्ये घट झाली होती. पण आता संख्या वाढत आहे. तसेच दहा आठवड्यांनंतर करोना मृत्यूंमध्येही पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक नियम पाळणे आणि लसीकरणाची गती वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला.