मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केली आहे. तब्बल चार कोटींची संपत्ती ईडीने जप्त करत अनिल देशमुख यांना हा एक मोठा झटका दिला आहे.
ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत सुमारे 4.20 कोटी रुपये इतकी आहे. ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचाही समावेश आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या. या प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामासुद्धा द्यावा लागला. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या ताब्यात घेतला असून आता कारवाईसुद्धा सुरू केली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, या प्रकरणात अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आणि त्यानंतर संजीव पलांडे यांना अटकसुद्धा झाली. त्यानंतर अनिल देशमुख यांना ईडीने समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. तसेच काही दिवसांपूर्वी ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून अनिल देशमुख यांच्या घरी धाडसुद्धा टाकण्यात आली होती.