उपमुख्यमंत्री पवार : वैद्यकीय, भौतिक सुविधांची पाहणी
पुणे – “जम्बो कोविड केंद्रा’ची उभारणी करताना दर्जेदार कामावर भर असावा. करोना संकटकाळात उत्तम आरोग्यविषयक सर्व सुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. गारपीट, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच जम्बो हॉस्पिटल उभारणीचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
पवार यांनी शुक्रवारी पिंपरी येथील आण्णासाहेब मगर क्रीडांगण, शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) प्रांगण तसेच म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियम येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड केअर केंद्राच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचना, ऑक्सिजनयुक्त, आयसीयू खाटा, व्हेंटिलेटरसह अन्य सुविधांयुक्त कोविड केंद्र उभारण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठा, दोन खाटांमधील अंतर, करोना बधितांवरील चाचण्या, विद्युतीकरण, वाहनतळ, शौचालय, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, डॉक्टर व परिचारिका यांच्या निवास-भोजनाची सोय, केंद्र परिसरात पावसाचे साचणारे पाणी आणि त्याचा निचरा व्यवस्थेसह पायाभूत सुविधांबाबत पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांनी यावेळी पवार यांना माहिती दिली.
शिवाजीनगर येथील जम्बो कोविड केंद्र पाहणी दौऱ्याच्यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.