नगर – गायींची चोरी करुन त्यांची कत्तल करत असल्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरुन एका तरुणास जबर मारहाण करण्यात आली. त्याच्या जीवितास संबंधित आरोपींकडून पुन्हा धोका होण्याचीच दाट शक्यता असल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक मतीन सय्यद यांनी केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक सय्यद यांच्या एका नातलग तरुणास गाईंची कत्तल प्रकरणात अडकलेल्यांकडून काल मारहाण करण्यात आल्याचा दावा सय्यद यांनी केला आहे. तसेच त्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा दावा सय्यद यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करुन त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सय्यद यांनी केली.
तसेच मारहाण करुन धमकाविणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली. आतिक शेख, मुस्तकीम शेख, आकिब शेख, अमान शेख, शहबाज शेख, कलीम शेख, मूईज शेख, अलीम शेख, नईम शेख यावेळी उपस्थित होते.
त्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. असे असताना ते आरोपी मोकाट फिरत आहे. त्यांना अटक न झाल्यास 10 ऑगस्टपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही सय्यद यांनी दिला.