मृत्यूदर 2.37, तर सक्रिय बाधितांचा टक्काही 27 वर
पुणे – शहरातील करोनाबाधितांची संख्या लक्षणीय वाढल्याने प्रशासनाने घेतलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. शहरात करोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी तब्बल 70.29 टक्के झाली आहे. शहरातील आतापर्यंतची ही सर्वाधिक टक्केवारी आहे.
करोनामुळे पुण्याचा मृत्यूदरही तब्बल 2.37 टक्क्यांपर्यंत खाली आला असून, सक्रिय बाधितांचा आकडा 27.36 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. यापूर्वी मागील चार महिन्यांत एकदाच 29 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. दरम्यान, पुण्याचा करोनामुक्तीचा दर देशापेक्षा अधिक आहे. शुक्रवारी देशात हे प्रमाण 67 टक्के होता. शहरात मार्चपासूनच्या कडक लॉकडाऊनमुळे करोनाबाधितांचा आकडा 10 हजारांपर्यंतच होता.
मात्र, जूनपासून लॉकडाऊन शिथिलतेनंतर बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे प्रशासनाने 14 जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. या वेळी शहरातील बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 57, सक्रिय बाधितांची संख्या 39, तर मृत्यूदरही 4 टक्के होता. त्यानंतर पुढील दहा दिवस शहरात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. याचे परिणाम आता दिसत असून, मागील दहा दिवसांपासून नवीन बाधितांचा आकडा घटण्यास सुरुवात झाली आहे. त्याचवेळी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.
आतापर्यंत 62 हजार 37 पैकी तब्बल 43 हजार 606 (70.29 टक्के) जण करोनामुक्त झाले आहेत. तर, सक्रिय बाधितांचा आकडा मागील आठवड्यातील 19 हजार 500 वरून 16 हजार 975 (27.36 टक्के) पर्यंत खाली आला आहे.