जैववैद्यकीय कचरा पुन्हा रस्त्यावर

महिन्याला दोन टन कचरा 

साताऱ्यात 100 हून अधिक लहान-मोठी रुग्णालये आहेत. येथून प्रत्येकाकडे एक ते पाच किलो वेगवेगळा वैद्यकीय कचरा जमा होतो. यामुळे महिन्याला शहरातून बायोमेडिकल म्हणून सुमारे दोन टन निघणारा वैद्यकीय घनकचरा सोनगाव कचरा डेपोत पर्यावरण व्यवस्थापन या आरोग्य खात्याशी संलग्न असलेल्या नेचर इन नीड या संस्थेकडे विघटनासाठी पाठविला जातो. यासाठी सभासदांकडून महिन्याला 2 ते 4 हजार रु. इतकी फी आकारली जाते. शहरातील एमबीबीएस डॉक्‍टर वगळता इतर डॉक्‍टरांकडून दैनंदिन कचऱ्याबाबत योग्य खबरदारी घेतली जात नाही. रुग्णालयातून दररोज निघणाऱ्या कचऱ्याचे ब्लू, यलो आणि रेड अशा पिशव्यांमध्ये वर्गीकरण केले जाते.

सातारा  – सातारा शहरात अद्ययावत औषधौपचार उपलब्ध असला तरी यातला वैद्यकीय कचरा मानवी जीवाला धोकादायक ठरत आहे. साताऱ्यात राधिका रोडवर बारटक्के चौकात जैववैद्यकीय कचरा रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुदत संपलेली औषध, इंजेक्‍शन, सलाइन बाटल्या रस्त्याच्या कडेलाच विल्हेवाटीशिवाय टाकून देण्यात आल्या होत्या. जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीला हॉस्पिटल गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा कचरा उचलला जात असला तरी साताऱ्यात काही वैद्यकीय संस्था अजिबात दाद देत नसल्याचे चित्र आहे.

सातारा शहरात लहान-मोठे शंभरहून अधिक दवाखाने आहेत. रुग्णांसाठी वापरण्यात आलेली वैद्यकीय उपकरणे ठराविक दवाखान्यातून ती वैद्यकीय प्रकल्पाला देऊन आपला परिसर स्वच्छ ठेवला जातो; पण साताऱ्यात राधिका रोडवर बारटक्के चौकातच उघड्यावर जैव कचरा टाकण्याचा प्रकार समोर आला. मुळात हा कचरा गोळा करण्यासाठी नेचर इन नीड ही संस्था स्वतंत्रपणे काम करते. सर्व कचरा गोळा करण्यासाठी या संस्थेने दवाखान्यांना तीन वेगवेगळ्या पिशव्या दिल्या आहेत. कचरा सुध्दा संस्थेच्या गाडीतूनच सोनगाव कचरा डेपोवर कक्ष तापमानाला वितळवला जातो. वैद्यकीय कचरा सातारा शहरात रिकाम्या जागेवर अथवा ओढे, नाले, येथे टाकला जातो. नागरिकांना वैद्यकीय कचऱ्याबाबत जागृती आणि माहिती नसल्याने त्याचा योग्य तो विचार न होता त्याचा गैरवापरही होतो.

दवाखान्यात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्‍शन, ट्यूब, सलाइन, पाइप यासह अन्य कचरा उघड्यावरच टाकला जातो. यामध्ये मुले वरील काही साधनांचा खेळण्यासाठी वापर करीत असतात. यातून अनेक अपायकारक घटना घडू शकतात. सरकारी अथवा खासगी दवाखान्यामध्ये प्रसुतीनंतर टाकावू अवयव व अन्य साहित्य उघड्यावरच टाकले जाते. त्यामुळे काही भागात दवाखान्याच्या परिसरात दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. वैद्यकीय कचऱ्याची अशीच समस्या राहिल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊन शकते. दोन वर्षापासून देशपातळीवर स्वच्छता मोहिमेचा उपक्रम शासनाने सुरू केला आहे. यानिमित्ताने राजकीय नेते, समाजसेवी संस्था उपक्रमात सहभागी झाल्या आहेत; पण वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्‍न तसाच आहे. या मोहिमेंतर्गत वैद्यकीय कचराही उचलण्याची जबाबदारी घेतल्यास हा प्रश्‍न निकालात निघेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)