सातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा

शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सातारा (प्रतिनिधी) – हद्दवाढीत सातारा पालिकेत समावेश झालेल्या गोडोली, विलासपूर, गोळीबार मैदान, शाहूनगर, चारभिंती, बॉम्बे रेस्टॉरंट, विसावा नाका, जरंडेश्वर जकातनाका परिसरात तीन महिन्यांपासून सुविधांची वानवा आहे. तीन महिन्यांपासून घंटागाड्यांची बिले दिलेली नाहीत. पथदिव्यांचे बील न दिल्याने रस्त्यावर अंधार असतो. 

प्राधान्याने हे प्रश्न सोडविण्यात यावेत, अशी मागणी आमदार शिवेंद्रराजे मित्र समूहाच्यावतीने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सोयीसुविधापासून हा भाग वंचित राहणार नाही. प्रत्यक्ष विलासपूरला मी भेट देईन, असे आश्वासन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिले. 

यावेळी फिरोज पठाण, मिलिंद कदम, नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे, राजू गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, सातारा पालिकेच्या हद्दवाढीमध्ये विभागातील त्रिशंकू भागाची “ना घर का ना घाट का’ अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या पाणी, वीज, रस्ते, गटार व कचरा या सर्व मूलभूत गरजांची जबाबदारी पालिकेकडे गेल्यामुळे मुलभूत सोयीसुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागोजागी तसेच विलासपुर ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिग साचले आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत महामार्ग प्राधिकरणाकडे आवश्‍यक तो पाठपुरावा करावा, रस्त्यावर दिवे नसल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.

विलासपुर, गोडोली, शाहूनगर भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. अगोदरच पालिकेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यात आमच्या हक्काच्या सोयीसुविधा देण्यास पालिका टाळाटाळ करत असेल तर पालिकेच्या विरोधात मोठे जनआंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.