पाचगणी (प्रतिनिधी) – केंजळ (ता. जावळी) येथील गट नंबर 62/1 मधील खाणीतील स्टोन क्रशरच्या परवान्याची मुदत संपूनही महाबळेश्वर-पंढरपूर रस्त्याच्या कामाला लागणारी खडी व डबर काढून वाहतूक केल्या प्रकरणी नवजित गडोख यांच्या रोडवे सोल्युशन कंपनीचा स्टोन क्रशर परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा जावळीच्या तहसीलदार मनीषा आव्हाळे यांनी सील केला आहे.
मुदत संपूनदेखील स्टोन क्रशर सुरू ठेवल्याने आणि शासनाची सात कोटी सात लाख रुपये रॉयल्टी न भरल्याने आव्हाळे यांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी दोन डम्परचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळेश्वर-पंढरपूर रस्त्याच्या कामासाठी डम्परमधून डबर व खडीची वाहतूक सुरू असल्याचे तहसीलदार मनीषा आव्हाळे यांना समजले. त्यांनी केंजळचे मंडलाधिकारी संतोष मुळीक व तलाठी सौ. डेरे यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार चौकशी करत असताना, केंजळ येथील गट नं. 62/1 मधील खाणीतून दोन डम्पर (एमएच-11-सीएच-3373 व एमएच-11-सीएच-3362) मधून दगडांची वाहतूक सुरू असल्याचे तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना दिसले.
त्यांनी डम्परचालकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे वाहतुकीचा परवाना नव्हता. त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डम्परमधून आठ ब्रास डबराची चोरून वाहतूक केल्याबद्दल दोन लाख 24 हजार 320 रुपये दंड आकारण्यात आला आहे.
केंजळ येथील स्टोन क्रशरच्या परवान्याची मुदत 1 जानेवारीला संपल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. नवगीत गडोख याच्या रोडवे सोल्युशन कंपनीचा हा क्रशर मनीषा आव्हाळे यांनी सील केला आहे. आव्हाळे यांनी केलेल्या कारवाईचे जावळीतील जनतेकडून स्वागत होत आहे. त्याचबरोबर गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे या कारवाईने दणाणले आहेत.