मुंबई: राज्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. करोनाच्या कचाट्यात सापडलेल्या आणखी एका 52 वर्षीय पोलीस हवालदाराचा आज (26 एप्रिल) मृत्यू झाला आहे. संबंधित पोलीस हे मुंबईतील पोलीस दलात कार्यरत होते. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत दोन पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका 52 वर्षीय पोलीस हवालदाराचा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, शनिवारी एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा करोनामुळे मृत्यू झाला होता. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी येथील रहिवासी होता.
दुसरीकडे धारावी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इन्सपेक्टरलाही करोनाची लागण झाली आहे. या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यापूर्वी शाहू नगर पोलीस ठाण्यातील 4 जण करोना पॉझिटिव्ह आढळले होते.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत 96 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. यात 15 अधिकारी आणि 81 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
प्रत्येकी 50 लाखांची आर्थिक मदत
मुंबई पोलीस दलातील करोनामुळे मृत्यू झालेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. दुर्दैवाने मुंबई पोलिसांच्या दोघा कर्मचाऱ्यांनी करोनाविरुद्ध सुरु असलेल्या युद्धात बलिदान दिले. सरकार दोन्ही कुटुंबियांसोबत आहे. दोन्ही परिवारांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल. आम्ही त्यांना आवश्यक ते सर्व देऊ , असे अनिल देशमुख म्हणाले. करोनाशी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.