पिंपरी, (प्रतिनिधी) – विद्युत भार वाढवून देण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरण भोसरी शाखेतील सहायक अभियंत्याला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी एका इलेक्ट्राॅनिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने तक्रार केली असून भोसरी पोलीस ठाण्यात लाचखोर सहायक अभियंता किरण गजेंद्र मोरे (वय ३३) याच्या विरोधात तक्रार दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार व्यक्ती एका इलेक््राॅनिक्स कंपनीत कामाला आहे. तक्रारदार व्यक्तीच्या कंपनीला दुसऱ्या एका कंपनीचे विद्युत भार वाढविण्याचे काम मिळाले होते. त्यानुसार तक्रारदाराने महावितरण कार्यालयात रितसर अर्ज केला. परंतु हे काम करण्यासाठी महावितरणचे सहायक अभियंता किरण मोरे याने ५० हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने याबाबत लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिल्यानंतर विभागाने सापळा रचला. पंचांसमक्ष किरण मोरे हा ४५ हजार रुपयांची लाच घेऊन काम करण्यास तयार झाला आणि पंचांसमक्ष त्याने लाच देखील स्वीकारली. त्यावेळी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरु आहे.
ही कारवाई विभागाचे पोलीस उपायुक्त/ अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअक्षीक्षक नितीन जाधव व त्यांच्या पथकाने केली. सरकारी कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास टोल फ्री क्रमांक १०६४, अॅंटी करप्शन ब्युरो पुणे २६१२२१३४, २६१३२८०२, व्हाॅट्स अॅप क्रमांक ७८७५३३३३३३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.