पुणे – पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून अपहरण करणाऱ्या आणि त्याला विकत घेणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. या बालकाची विक्री दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावातील एकास तीन लाखांना करण्यात आली होती. त्याच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली. मुख्य आरोपी फरार असून, त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
चंद्रशेखर मालकाप्पा नड्डगंड्डी (२४, रा. जांबगी, जि. विजापूर, कर्नाटक), सुभाष पुतप्पा कांबळे (५५, रा. लवंगी, जि. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली.
अपहरणाची घटना शुक्रवारी (दि. २७) घडली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्रावण अजय तेलंग (सात महिने) असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अजय तेलंग यांनी तक्रार दिली होती. अजय तेलंग यांची आई येरवडा कारागृहात आहे. तेलंग दाम्पत्य मूळचे यवतमाळचे आहे.
आईला भेटण्यासाठी तेलंग आणि त्याची पत्नी पुण्यात आले होते. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात तेलंग दाम्पत्य झोपले होते. त्या वेळी मुलगा श्रावण याला उचलून नेण्यात आले. पोलिसांनी तातडीने तीन पथके तयार करून पुणे स्टेशन परिसरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले.
यामध्ये गुन्ह्यात कारचा वापर आणि एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता दिसली, तर तांत्रिक विश्लेषणात आरोपी विजापूर (कर्नाटक) येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी विजापूर येथे सापळा रचून चंद्रशेखर नड्डगंड्डी याला ताब्यात घेतले.
नड्डगंड्डी याने गुन्ह्याची कबुली देत ४ साथीदारांच्या मदतीने पुणे स्थानकातून अपहरण केल्याचे सांगीतले, तसेच बालक ३ लाख रुपयांना सुभाष कांबळेला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी विजापूर येथील एका हॉटेलमधून आरोपी सुभाष कांबळेला बालकासह ताब्यात घेतले.
वारसा चालविण्यासाठी विकत घेतले बाळ
बाळाला विकत घेणाऱ्या सुभाष कांबळेच्या कुटुंबातील बायको, मुलगा आणि सुनेचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबाचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी मूल दत्तक घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार ओळखीच्या काही तरुणांना त्यांनी अनाथाश्रमातील मूल कुठे मिळू शकेल का? अशी विचारणा केली होती. संबंधित आरोपींनी कांबळे याला सांगितले, की तुम्हास मूल मिळवून देतो. तीन लाख रुपये द्यावे लागतील. त्यानुसार सुभाष कांबळे याने आरोपींना काही रक्कम आगाऊ दिली होती.
शोध पथकाचा आयुक्तांकडून गौरव
बालकाचा शोध घेणाऱ्या बंड गार्डन पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रोख एक लाख रुपये बक्षीस देऊन पथकाचा गौरव केला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त संजय सुर्वे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान पवार,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाले, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, उपनिरीक्षक चेतन धनवडे, पोलीस अंमलदार सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, सागर घोरपडे, मंगेश बोराडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू धुलगुडे, विलास केकान यांच्या पथकाने केली.