पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने कोथरूड येथील हॉटेल खिंड ढाब्यावर छापा टाकला. यामध्ये ढाबाचालक ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था करुन देत असताना आढळून आला.
या प्रकरणात ढाबाचालकासह चार मद्यपींना अटक करुन एकाच दिवसात आरोपपत्र दाखल करुन न्यायालयासमोर सादर केले. न्यायालयाने ढाबाचालकाला १ लाख रुपयांचा दंड, मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
राज्य उत्पादन शुल्क “सी’ विभागाच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली होती. यामधध्ये ढाबा चालक योगेश सुरेश माथवड हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देताना आढळल्याने त्याचेसह चार मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रताप बोडेकर, किरण पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक संदिप लोहकरे, महिला जवान उज्ज्वला भाबड, जवान शरद भोर, गोपाळ कानडे व वाहनचालक सचिन इंदलकर यांच्या पथकाने पार पाडली.
लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ढाबा, हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर मद्य विक्री, तसेच तेथे मद्यपान कायद्याने गुन्हा आहे, असे निरीक्षक एस. एस. कदम यांनी म्हटले आहे.