पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निरामय संस्थेच्या किशोरी शक्ती प्रकल्पाअंतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या इचलकरंजी सभागृहात तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बर्मा सेल, लोहगाव येथील दैनंदिन किशोरी वर्गाने यंदाचा ‘प्रियम राठी करंडक’ पटकावला.
संत तुकाराम महाराजांची जीवनमूल्ये शिकवणाऱ्या ‘लहानपण देगा देवा’ या विषयावर आधारीत या शिबिरात २३ वस्त्यांमधील ६२८ मुलींनी सहभाग घेतला होता. ‘वर्गाची नियमितता, उपक्रमशीलता, पालक- पाल्य सहभाग’ या निकषांवर सर्वश्रेष्ठ ठरल्यामुळे बर्मा सेल, लोहगावच्या किशोरींना स्व. प्रियम राठी हिचे पालक सत्येंद्र राठी आणि मोनिका राठी यांच्या हस्ते ‘प्रियम राठी करंडक’ बहाल करण्यात आला.
समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील क्लब साताराच्या माजी चेअरमन गीता मामनिया, प्रकाश धोका, निरामय संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, सचिव ज्योतीकुमार कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी राष्ट्रीय सेविका समितीच्या अखिल भारतीय महिला सहसमन्वयक भाग्यश्री साठे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात नाट्य सादरीकरण, पोवाडे, देशप्रेमावरील गीते, गप्पा, हस्तकौशल्ये, मैदानी खेळ, योगासने, झुम्बा, हास्ययोगांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.