भोपाळ – मध्यप्रदेशमधील नेते समंदर पटेल यांनी भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये फेरप्रवेश केला. कॉंग्रेसवापसी केलेले ते केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे पाचवे समर्थक ठरले आहेत. मध्यप्रदेशातील ती घडामोड ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी आणखी एक राजकीय धक्का ठरली आहे.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य असणाऱ्या 52 वर्षीय पटेल यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कमल नाथ यांच्या उपस्थितीत त्या पक्षात पुन्हा प्रवेश केला. समर्थकांनी भरलेल्या तब्बल 800 वाहनांच्या ताफ्यासह ते कॉंग्रेसमध्ये वापसी करण्यासाठी दाखल झाले. भाजपमध्ये दुर्लक्षित करण्यात आल्याने तो पक्ष सोडल्याची भूमिका पटेल यांनी मांडली.
मागील विधानसभा निवडणुकीत (वर्ष 2018) ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. त्या निवडणुकीत पराभूत झाले तरी त्यांनी सुमारे 35 हजार मते मिळवली. मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य आणि त्यांचे काही समर्थक आमदार कॉंग्रेसमधून बाहेर पडले. त्यांच्या समवेत पटेल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. बंडखोरीमुळे कॉंग्रेसचे सरकार कोसळून मध्यप्रदेशात भाजपला पुन्हा सत्ता मिळाली. त्या राज्यात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल.